*राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विज्ञान एकांकिकेला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक*
‘सौरवादळ ते आणि आम्ही’ एकांकिकेची मुंबईतील अंतिम फेरीसाठी निवड
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा–२०२६ मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, नाशिकच्या ‘सौरवादळ ते आणि आम्ही’ या विज्ञान एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे एकांकिकेची मुंबई येथे होणाऱ्या पुढील अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि विज्ञानाविषयीची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या नाशिक शैक्षणिक (शहर) व खुल्या गटातील सादरीकरणात राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ‘सौरवादळ ते आणि आम्ही’ ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली.
या एकांकिकेचे लेखन: राजीव जोशी, दिग्दर्शन: युगा मिलिंद कुलकर्णी, नेपथ्य: नचिकेत महेश मुळे, प्रकाशयोजना: संकेत लक्ष्मण सोनवणे, पार्श्वसंगीत: सोहा मिलिंद कुलकर्णी, तर रंगभूषा व वेशभूषा: गार्गी दिनेश वैद्य यांनी सांभाळली. एकांकिकेची निर्मिती मराठा विद्या प्रसारक समाज, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, नाशिक यांची आहे.
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे मराठीतील प्रभावी सादरीकरण
या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘सौरवादळ ते आणि आम्ही’ या एकांकिकेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे आहेत. असे असतानाही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवत संवादफेक, अभिनय, भावभावना आणि रंगमंचावरील सादरीकरणाच्या माध्यमातून एकांकिका अत्यंत प्रभावी व सुंदर पद्धतीने सादर केली. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी मराठी विज्ञान एकांकिका राज्यस्तरीय व्यासपीठावर प्रभावीपणे सादर करून मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या एकांकिकेत अथर्व माळवतकर, गार्गी रनाळकर, समर्थ जाधव, अवनी भवर, सर्वेश पिंगळे, करण तायडे, संस्कृती पवार तसेच स्वयंसेवक म्हणून सृष्टी पाटील, श्लोक गव्हाणे आणि सार्थक खेमनार यांनी भूमिका साकारल्या. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्राचार्य प्रा. प्रशांत पाटील, प्रा. टी. के. ठाणगे आणि प्रा. पी. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, सभापती मा. बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनीलजी ढिकले, उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांनी विशेष कौतुक केले.
मुंबई येथे होणाऱ्या पुढील फेरीतही या एकांकिकेची प्रभावी कामगिरी होऊन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
